पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी (दि. 30) पाच नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कामोठ्यातील मुंबईचे दोन सफाई कामगार, एक फार्मा कंपनीतील सुपरवायझर, नवीन पनवेलमधील एक व्यक्ती आणि खारघरमधील पूर्वीच्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 69 रुग्ण झाले आहेत. ग्रामीणमध्ये नवीन रुग्ण नसल्याने पनवेल तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 80 झाली आहे, तर उरणमधील एक नवा रुग्ण मिळून जिल्ह्यातील एकूण आकडा 97वर गेला आहे.
पनवेलमध्ये आढळणार्या रुग्णांत मुंबईला अत्यावश्यक सेवा देणार्यांचे प्रमाण जास्त आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे सेक्टर 11 मधील 28 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहे आणि सेक्टर 21 मधील 29 वर्षीय व्यक्ती मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे. या सेक्टरमधील दुसरी 37 वर्षीय व्यक्ती मुंबई गोवंडी येथे फार्मा कंपनीत सुपरवायझर आहे. या व्यक्तीला प्रवासात संसर्ग झाल्याची शक्यता आहे. खारघर सेक्टर 4 मधील 33 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, तिच्या पतीला याआधी कोरोना झाला असल्याने त्याच्यापासून तिला संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवीन पनवेल सेक्टर 9 मधील 54 वर्षीय व्यक्तीलाही कोरोना झाला आहे. या व्यक्तीला मेडिकल दुकानातून औषध आणताना संसर्ग झाल्याचा निष्कर्ष असून, त्या दुकानातील कामगारांची तपासणी सुरू आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील 891 जणांची टेस्ट झाली आहे. त्यापैकी 66 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 39 जणांवर उपचार सुरू असून, 28 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी दाखवण्यात आलेला एक रुग्ण खारघर येथील मित्र हॉस्पिटलमधील एक्स-रे टेक्निशियन होता. तो मूळचा गोवंडीतील असल्याने त्याची नोंद मुंबईत करण्यात आल्याने पनवेलच्या बुधवारच्या रुग्णांची संख्या सातऐवजी सहा झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. ग्रामीण भागातील 11 पैकी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …