पेण : प्रतिनिधी
पेण नगरपरिषद व एमजीएम रुग्णालय, कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने पेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष करून या रक्तदानात आमदार रविशेठ पाटील यांच्या कुटुंबाने हिरहिरीने भाग घेत देशाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या मोठ्या स्नुषा शर्मिला वैकुंठ पाटील व धाकटे चिरंजीव ललित पाटील यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयात क्षय रोग, कॅन्सर, किडनीविकार, थॅलेसेमिया, असलेल्या रुग्णांना रक्तची गरज भासत आहे. परंतु अनके ठिकाणी रक्तदान शिबिर बंद झाल्यामुळे अशा रुग्णांना रक्ताची चणचण भासू लागली आहे. यामुळे पेण नगरपरिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करीत रक्तदात्यांनी शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला. या वेळी 168 बॅग रक्त संकलित करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सभापती तेजस्विनी नेने, अॅड. मंगेश नेने, तेजस्वीनी नेने, मंगेश नेने, सभापती दर्शन बाफणा, नगरसेवक सुहास पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, कुणाल नाईक, अभिराज कडु आदी उपस्थित होते.