
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात विजेच्या वस्तू ना दुरुस्ती झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु उरणमध्ये रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हार्डवेअर व विद्युत उपकरणे दुरुस्ती, बुक स्टेशनरी विक्रेते, प्लायवूड विक्रेते, स्पेअर पार्ट्स विक्रेते, मोबाइल रिफिलिंग, अगरबत्ती विक्रेते आदी दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. बंद पडलेली विद्युत उपकरणे दुरुस्तीसाठी देण्यासाठी नागरिक रांगेत उभे राहून सोशल डिस्टन्सिंग पालन करीत होते. दुरुस्तीची दुकाने सुरु झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकाने सुरु झाल्याने हार्डवेअर व जनरल स्टोअर्स व विद्युत सामान विक्री दुकाने, विद्युत उपकरणे दुरुस्ती आदी दुकानामध्ये काही नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिक रांगेत व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन सामान खरेदी करताना दिसत होते. सध्या उन्हाळा सुरु असून असह्य उकाडा जनतेला हैराण करीत आहे. त्यातच इलेक्ट्रीक साहित्य दुकाने व विद्युत उपकरणे दुरुस्ती करणारी दुकाने बंद असल्याने नागरिकांचे हाल होत होते. 22 मार्चच्या अगोदरपासून काही ठिकाणी विजेच्या वस्तू नादुरुस्त झाल्या आहेत. विद्युत उपकरणे दुरुस्ती व हार्डवेअर दुकाने सुरु झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. हार्डवेअर व विजेच्या वस्तूंची दुकाने बंद असल्याने अनेक पंखे, नादुरुस्त झाली आहेत, हार्डवेअर दुकानात प्लंबरचे सामान मिळते. त्यामुळे पाण्याचे पाईप लवकरच दुरुस्त करता येतील. पंखे बंद असल्याने उकाडा सहन करावे लागत आहे. या उकाड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मिक्सर बंद झाल्याने जेवणासाठी लागणारे वाटण वाटणे सुद्धा त्रासाचे झाले होते. दुकाने काही ठराविक वेळेत सुरु झाल्याने महिला वर्गाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
मिक्सर बंद असल्याने दगडी पाटा व वरवंटा शोधून त्यावर भाजीसाठी वाटण वाटणे जीकरीचे होते. परंतु आता दुकाने सुरु झाल्याने आमचा वाटण वाटण्यासाठी लागणारा वेळ, त्रास कमी झाला. वेळेवर मिक्सर दुरुस्त झाल्याने वेळ वाचला. आम्हाला दिलासा मिळाला आहे.
-प्रियंका ठाकूर, गृहिणी
लॉकडाऊन असल्याने पंखे, मिक्सर, विद्युत मोटर दुरुस्ती करण्याचे काम बंद होते. या कालावधीत अनेक पंखे, मिक्सर मोटर्स बंद झाल्या होत्या. दुकान बंद असल्याने त्या वस्तू वेळेवर दुरुस्तीसाठी नागरिक येत नव्हते, रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दुकाने सुरु झाल्याने नागरिकांनी सकाळपासूनच सोशल डिस्टन्सिंग व सरकारी नियमांचे पालन करून बिघाड झालेल्या मिक्सर, पंखे, इलेक्ट्रीकल मोटर, दुरुस्तीसाठी आणत आहेत.
-महम्मद भाई, विद्युत वस्तू दुरुस्त करणारा कारागीर