Breaking News

श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद

श्रीवर्धन : प्रतिनिधी

मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे शेती-मळेही उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत, मात्र त्याकडे नगरपालिका डोळेझाकपणा करीत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजारपेठ, एसटी बसस्थानक व आगार परिसरात मोकाट गुरे व घोडे दिवसा व रात्रीच्या वेळी फिरत असतात. शहरामधील काही आळ्या, पाखाडी तसेच समुद्र किनार्‍यावरील शेतकरी भातशेती करतात, तसेच चवळी, वाल, भाजीपालाही पिकवतात, मात्र दिवसरात्र फिरणारे मोकाट घोडे व गुरे कुंपण तोडून किंवा कुंपणावरून उड्या मारून शेतामध्ये शिरतात आणि भातपिकाची नासधूस करतात तसेच चवळी, वाल, भाजीपाला खातात. घोड्यांच्या लिदीमुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. श्रीवर्धनमधील र. ना. राऊत माध्यमिक हायस्कूलच्या पाठीमागच्या शेतात किंवा समुद्रकिनारी सुरूच्या झाडांना काही वेळा घोडे बांधून ठेवतात. त्या परिसरात लिदीमुळे नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. त्या दुर्गंधीचा त्रास पर्यटक, नागरिक आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना  सहन करावा लागतो.

शहरामध्ये सर्वत्र नारळ, सुपारी व केळीच्या बागा आहेत, मात्र मोकाट गुरे व घोडे केळीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकर्‍यांनी गुरांसाठी साठवून ठेवलेला पेंढा व गवत फस्त करतात. या मोकाट गुरे व घोड्यांचा दुकानदार, विक्रेते व वाहनचालकांनासुद्धा मोठा त्रास होतो.

पूर्वी शहरात गुरांचा कोंडवाडा होता. तो तोडून त्या ठिकाणी नगरपालिकेने पर्यटन निवास बांधले आहे. पर्यटन निवास बांधताना उनाड गुरेढोरे, घोडे व इतर भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या प्रकारची व्यवस्था नगर परिषदेने करायला हवी होती तशी केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोकाट गुरे व घोड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरातील मोकाट गुरे व घोड्यांमुळे होणार्‍या त्रासाबाबत अनेक वेळा श्रीवर्धन नगरपालिकेला निवेदने दिली.  प्रत्यक्ष भेटूनसुद्धा तक्रारी केल्या, मात्र नगरपालिका प्रशासन या समस्येकडे

जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. श्रीवर्धनमधील मोकाट गुरे व घोड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेने त्वरित प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply