नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना रुग्ण वेळेत निदर्शनास यावे, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सद्यस्थितीमध्ये 2,266 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्क्यांवर पोहचले आहे. मृत्युदर 3.54 वरून 2.19 वर आला आहे. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्यात येत आहेत. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेने खासगी व मनपा रुग्णालयांमध्ये 131 व्हेंटिलेटर्स, 335 आयसीयू, 2,266 ऑक्सिजन बेड व 3,308 सर्वसाधारण बेड उपलब्ध केले आहेत, याशिवाय कोविड केअर सेंटरमध्ये 2,856 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली, तरी बेडची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरसह मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील निर्यात भवन, तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग भवन, सानपाडामधील एमजीएम रुग्णालय येथेही नवीन सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत तब्बल दीड लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. महानगरपालिकेने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल सव्वाचार लाख नागरिकांचे क्वारंटाइन पूर्ण केले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 28 टक्के आहे. अँटिजेन व स्वत:च्या लॅबमुळे चाचणीसाठीचा विलंब थांबला आहे. नागरिकांना शहरातील उपलब्ध रुग्ण खाटांची माहिती मिळावी, यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. मनपाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स व आयसीयू कोणत्या रुग्णालयात उपलब्ध आहेत, याचीही माहिती दिली आहे. खासगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आली आहे.