Breaking News

सुनील तटकरे यांचे मधू ठाकूरांपुढे लोटांगण

अलिबाग : प्रतिनिधी

सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना करणार्‍या काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यशस्वी झाले असून, गुरुवारी धूळवडीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने अलिबागेत आलेल्या सुनील तटकरे यांनी पापांपुढे चक्क लोटांगण घालत निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दोन नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीमधील चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही, मात्र येत्या दोन दिवसांत ठाकूर आपली भूमिका जाहीर करतील, असे सांगण्यात आले.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मधुकर ठाकूर यांचा पराभव झाला होता. मधुकर ठाकूर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. त्याचे शल्य मधुकर ठाकूर यांना होते. सुनील तटकरे यांच्यामुळेच आपला पराभव झाला असे मधुकर ठाकूर यांना वाटत होते. सुनील तटकरे यांना अलिबागमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना मधुकर ठाकूर यांनी केली होती. क्रीडाभवन येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार होते. त्याला  मधुकर ठाकूर यांच्या समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे ही स्पर्धाच रद्द करण्यात आली होती.

अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरे यांनी ठाकूरांच्या घरी पायधूळ झाडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.गुरुवारी सकाळी 10 वाजता सुनील तटकरे हे मधुकर ठाकूर यांच्या अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या निवासस्थानी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर, माजी तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.

मधुकर ठाकूर सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक होते. सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांना मध्यस्थी टाकून मधुकर ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी झाला होता. गुरुवारी सुनील तटकरे यांनी थेट मधुकर ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊनच त्यांची भेट घेतली आणि आपल्याला मदत करण्याची विनंती केली. दोघांमधील भेटीतील चर्चेचा तपशील समजला नसला, तरी दोन नेत्यांचे मनोमीलन झाले आहे. मधुकर ठाकूर यांनी आपली भूमिका अजून जाहीर केलेली नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत ठाकूर आपली भूमिका जाहीर करतील, असे सांगितले.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply