रोहे : प्रतिनिधी
राष्ट्रीय पोषण आहार महासप्ताहानिमित्त रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे येथील प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 24) रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. चिंचवली आदिवासीवाडीतील मुलांनी पालकांसोबत जंगलात जाऊन रानभाज्या आणल्या व या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.
या प्रदर्शनात तेरी, अळू, माट, लाल माट, कोहळ, टाकळा, भवरीचे पाने, कुरडू आदी रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. मुलांनी या रानभाज्याचे महत्त्व सांगितले. या भाज्या कशाप्रकारे उपयुक्त असतात, याबद्दल पालकांनी माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव, उपशिक्षिका हर्षा काळे, अंगणवाडी सेविका कल्पना बुरुमकर यांनी या रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, महिला पालक व विद्यार्थी उपस्थित होते.