रायगडात लाईफलाईन एक्स्प्रेस होणार दाखल

आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी
गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही मोफत करता याव्यात यासाठी 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान लाईफलाईन एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
लाईफलाईन एक्स्प्रेस ही हॉस्पिटल ट्रेन देशातील वेगवेगळ्या भागातून प्रवास करते. आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार ती वेगवेगळ्या स्थानकांवर थांबते आणि या माध्यमातून तिथल्या स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर ही ट्रेन तिथे काही दिवस मुक्काम करते. या दरम्यान तिथल्या रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. एखाद्या आजारावर ट्रेनमध्ये उपचार होत नसेल, तर जवळच्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. ही हॉस्पिटल ट्रेन स्थानिक प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करते. 15 सप्टेंबरपासून ही ट्रेन रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोतिबिंदू असणारे, कानांचे विकार असणारे, ऐकू येत नसणार्‍या, ओठ, भाजलेले शरीर असणारे, पाय वाकडे असणे अशा प्रकारच्या सर्व रुग्णांचा शोध घेऊन वेळापत्रकानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव व उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना कार्यक्रमाची माहिती देऊन ती माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी, जेणेकरून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येईल, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केल्या आहेत.
लाईफलाईन एक्स्प्रेसतर्फे पुरविण्यात येणार्‍या सेवा
डोळ्यांचे परीक्षण, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, कानांचे विकार असणार्‍या रुग्णांचे परीक्षण व शस्त्रक्रिया, वाकड्या पायांची तपासणी किंवा शस्त्रक्रिया (14 वर्षाखालील), फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील परीक्षण व शस्त्रक्रिया, स्त्रीरोग परीक्षण (स्तन व गर्भाशय, ग्रीव्हा, कॅन्सर परीक्षण), दातांचे परीक्षण व उपचार.

Check Also

Jedes Online Spielbank wird beflei?igt, stets neue Fans anzuziehen

Nahe den Freespins eignen zudem mehr als einer weitere Optionen gebraucht, um Neukunden nach vollbringen …

Leave a Reply