Breaking News

‘अमृत आहार’चा पोषण आहार घरपोच

कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात समाजातील स्तनदा माता व गरोदर महिलांच्या अतिरिक्त पोषण आहाराचा प्रश्न समोर आला होता, मात्र कर्जत तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच पोषण आहार पोहचत आहे. डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अन्न बनवून घरपोच पोहचवत आहेत.

 कर्जतच्या 330 अंगणवाड्यांमधील कारभार ठप्प झाला आहे. शाळा-कॉलेजप्रमाणे अंगणवाडीतही बालके येत नाहीत, मात्र याला कर्जतमधील आदिवासी भाग अपवाद असून तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमध्ये संभाव्य कुपोषण रोखण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून सुरू केलेली डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना मदतीला आली आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासीबहुल भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक असते. अमृत आहार योजनेत आदिवासी विकास विभागाच्या उपविभागात येत असलेल्या अंगणवाड्यांचा समावेश आहे.त्या अंगणवाड्यांमधील बालकांना तसेच स्तनदा माता व गरोदर महिलांना अमृत आहार योजनेतून अतिरिक्त आहार दिला जातो. कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेऊन शासनाने त्या विभागाला अमृत आहार योजनेमधून अतिरिक्त आहार देण्याचा निर्णय घेतला होता. त्या माध्यमातून अतिरिक्त आहार देण्यात येतो. अतिरिक्त आहारात स्तनदा माता व गरोदर महिलांना सकस आहार म्हणून जेवण, तर अंगणवाडीमधील बालकांना त्यांच्या दररोजच्या पोषण आहारासह अंडी व केळी यांचा अतिरिक्त आहार

दिला जातो.

 लॉकडाऊनमध्ये नेहमीचा पोषण आहार व अतिरिक्त पोषण आहार कसा द्यायचा, असा प्रश्न एकात्मिक बालविकास प्रकल्प यांना पडला होता. त्यावेळी अमृत आहार योजना बंद केली तर कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर येणार होता. ते लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवाळ यांनी तालुक्यातील ज्या अंगणवाड्यांत अमृत पोषण आहार योजना सुरू ठेवली, तेथील 135 अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एकत्र केले. लॉकडाऊन असले तरी अतिरिक्त पोषण आहार पोहचवला पाहिजे यासाठी मदतीचा हात पुढे केला. कर्जत तालुक्यातील विभाग एकमधील 47 व विभाग दोनमधील 88 अंगणवाडी केंद्रांतील कार्यकर्त्यांनी पोषण आहार बनवून देण्याची जबाबदारी पार पाडण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर कोणताही खंड न पडता कर्जत तालुक्यात अमृत आहार योजनेचा पोषण आहार पोहचवला जात आहे. पोषण आहार स्तनदा माता व गरोदर महिलांना घरपोच सुक्या धान्याच्या स्वरूपात पोहचवला जात आहे. 135 अंगणवाड्यांमधील बालकांना शिजवलेला पोषण आहार घरोघरी जाऊन पोहच केला जात आहे.

आम्ही अमृत आहार योजना कोणताही खंड न पाडता राबवत आहोत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील जी बालके अंगणवाडी केंद्रात येतात, त्यांच्यासाठीही ही योजना राबविली जाते. 135 अंगणवाडी केंद्रांत स्तनदा माता आणि गरोदर महिलांना अतिरिक्त पोषण आहार पोहचवला जात आहे. आमच्या सेविका स्वतःची काळजी घेऊन आणि प्रसंगी वेळ मिळताच त्या त्या अंगणवाडी क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याचे कामही करतात.

-निशिगंधा भवाळ, प्रकल्प अधिकारी, कर्जत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply