पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत 10 आणि ग्रामीणमध्ये सात अशा 14 नवीन रुग्णांची बुधवारी (दि. 13) तालुक्यात नोंद झाली. या रुग्णांमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि नवीन पनवेलमधील वकिलाचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये नेरे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील कोरानाबाधितांची संख्या 199 आणि तालुक्यातील 273 झाली आहे, तर उरणमधील 44 नवे रुग्ण धरून जिल्ह्याचा आकडा 397वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 8 महावीर वास्तूमध्ये राहाणार्या व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. ते मेडिकल स्टोअर्समध्ये नेहमी जात असत. त्या सोसायटीत यापूर्वी दोघांना कोरोना झाला होता. त्यांच्यापासून त्यांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. सेक्टर 17 मधील रिद्धी-सिध्दी दर्शन सोसायटीतल महिलेचे पती गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना कोरोना झाला होता. त्यांच्यापासून तिला संसर्ग झाला आहे. सेक्टर 6 मधील अनंत वाटिका सोसायटीतील नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 14 लेक व्ह्यू अपार्टमेंटमध्ये राहणार्या व मुंबई महापालिकेत सफाई कामगार असलेल्या व्यक्तीला कोरोनाा झाला आहे. सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्समधील महिलेला कोरोना झाला असून, तिच्या घरातील तीन व्यक्ती यापूर्वी पॉझिटिव्ह आल्या आहेत.
खारघर सेक्टर 10 येथील सेन सिटी सोसायटीत राहणार्या व मुंबईत माजगाव येथे बँक ऑफ इंडियात व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. सेक्टर 8 भूमी हाईट्स येथील टाटा पॉवरमध्ये राहणार्या व चेंबूरला अभियंता असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. सेक्टर 21 ज्ञानसाधना सोसायटीत राहणार्या व धारावी बेस्ट आगारातील वाहकालाही कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे.
खांदा कॉलनी सेक्टर 7 मधील व्हीजन सोसायटीत राहणार्या 19 वर्षीय घाटकोपरला फार्मासिस्ट कंपनीत असणार्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील गुलमोहर पार्कमधील वकील असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, ग्रामीण भागातील उमरोली येथील पॉझिटिव्ह असलेल्या नातेवाइकांच्या संपर्कात असल्याने त्यांना संसर्ग झाला.
पनवेल महापालिका हद्दीत बुधवारपर्यंत 1573 जणांची कोरोना टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 27 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. पॉझिटीव्हपैकी 104 जणांवर उपचार सुरू असून, 88 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर आज दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये बुधवारी नेरे येथील रिव्हर साईड ग्रीन सोसायटीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यामध्ये पाच वर्षांपासून 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक मुंबईहून नेर्याला आले होते. त्यांच्यापासून संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. उलवे नोड सेक्टर 5 आणि 21 मधील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना झाला आहे. यापैकी एक नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये काम करीत असून, दुसरी व्यक्ती परळ येथे मुंबई बँकेत काम करीत आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाचे 74 रुग्ण झाले असून, 11 जण बरे झाले, तर 61 जणांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …