Breaking News

केंद्राकडून बळीराजाला दिलासा

कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताच्या मोहिमेची घोषणा करून त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यातील दोन टप्प्यांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली, तर शुक्रवारी (दि. 15) शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाबाबत पॅकेज जाहीर केले.
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीचे एक लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे. शेतकरी ओला, सुका दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीला नेहमी तोंड देत असतो. यामध्ये फळे उत्पादन, डाळी, गहू, ऊस उत्पादक शेतकरी भरडला जातो. त्यांच्यासाठी लॉकडाऊनमध्ये काही पाऊले उचलण्यात आली आहेत. पीएम किसान योजनेतून 18500 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. या काळात दुधाची विक्री कमी झाली. या योजनेतून पाच हजार कोटी रुपये दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना देण्यात आले आहे. याचा एकूण दोन हजार कोटी शेतकर्‍यांना फायदा झाला, असे सीतारामन यांनी सांगितले.
मच्छीमारांसाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. त्यांना मत्स्यपालनासाठी मदत देण्यात आली आहे. एक लाख कोटी अ‍ॅग्रीगेटर, आयपीओ, कृषी संस्था, कृषी उद्योजक यांना शेतीची अद्ययावत उपकरणे, कोल्ड स्टोरेज, धान्यसाठा कोठारे बनविण्यासाठी देण्यात येणार आहेत. याद्वारे परदेशात शेतमाल पाठविण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 10 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मत्स्य उद्योगासाठी 20 हजार कोटींची मदत देण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत 70 लाख टन उत्पादन घेण्यात येईल. याद्वारे 55 लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे सीतारामन यांनी नमूद केले.
अन्य महत्त्वपूर्ण घोषणा
* मत्स्य व्यवसायासाठी 20 हजार कोटी रुपये
* पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी 15 हजार कोटी रुपये
* पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी रुपये
* अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 10 हजार कोटी रुपये
* औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी चार हजार कोटी रुपये
* मधमाशी पालन व्यवसायासाठी 500 कोटी रुपये
* भाजीपाला वाहतुकीवर 50 टक्के सबसिडी
* लॉकडाऊन काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply