हल्ल्यात दोन बकर्यांचा मृत्यू
रेवदंडा : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील टेंभुर्डी आदिवासीवाडीत एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकर्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
फणसाड अभयारण्यालगत भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टेंभुर्डी आदिवासीवाडीवर रात्रीच्या सुमारास तेथील रहिवासी संगीता वाघमारे यांच्या मालकीच्या दोन बकर्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यासंदर्भात निलेश घाटवळ यांनी मुरूडचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी बोर्ली वनविभागाचे अधिकारी गणपत वाडकर व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी पाठवून परिस्थितीचे अवलोकन केले आणि रितसर पंचनामा करून घेतला.
कडक उन्हाळा व पाण्याचा तुटवडा भासत असल्याने फणसाड अभयारण्यातील वन्यप्राणी गावालगत तहान भागविण्यासाठी येतात. पाण्यासाठी बिबट्या चणेरा, सारसोली जंगल भागातून भोईघर परिसरात आला असावा. पाण्याच्या शोधात गावाच्या हद्दीत प्रवेश करून ते पाळीव प्राण्यांना लक्ष्य करतात, असे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.