पनवेल : वार्ताहर
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याचबरोबर विविध उपक्रमांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून श्रमसंस्कार केले जातात. या माध्यमातून श्रमाचे महत्त्व एक प्रकारे पटवून दिले जाते. दरम्यान, याच उद्देशाने कळंबोलीतील केएलई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रोडपाली तलावालगत स्वच्छता अभियान घेतले. महापालिकेच्या सहकार्याने त्यांनी परिसर स्वच्छ केला. आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.
रोडपाली येथील म्हसोबा तलाव जुना आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. आजूबाजूला वाढलेली लोकवस्ती आणि येथील रहिवाशांना काहीसा विरंगुळा मिळावा, त्याचबरोबर मॉर्निंग वॉक करण्यासाठी सोय व्हावी या अनुषंगाने सिडकोकडून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. तलावातील गाळसुद्धा काढण्यात आला. विसर्जनाकरिता स्वतंत्र व्यवस्था येथे करण्यात आली. असे असतानाही येथे येणारे नागरिक तलाव परिसरातच कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात कचरा साठला होता.
या पार्श्वभूमीवर केएलई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महापालिकेबरोबर म्हसोबा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या ठिकाणचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. तलावात साचलेला कचरा बाहेर काढण्यात आला. या वेळी महादेव विद्यालयाच्या प्रा. सविता शिरगनवार, पल्लवी सोलसे, सचिन मोरे, कविता दंगेटी, हिमानी अग्रवाल, सुलोचना भालेकर, संध्या खरे, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, स्वच्छता पर्यवेक्षक हरेश कांबळे, निरीक्षक अखिल रोकडे, हर्षद पाटील, प्रेमनाथ गायकवाड आदी 27 विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.