Breaking News

किराणा मालाच्या दुकानातून मद्यविक्री करणार्यास अटक

पनवेल : वार्ताहर

किराणा मालाच्या दुकानातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्य विक्री करणार्‍या किराणा मालाच्या दुकानदाराला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही तळोजा फेज-2 मधील एका किरणा दुकानातून अवैधरित्या मद्य विक्री केली जात असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या दुकानावर छापा टाकला. या वेळी दुकानातील फ्रिजच्या पाठीमागील असलेल्या बॉक्समध्ये विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्याने दुकानमालक सचिन रासकर याला ताब्यात घेतले. या ठिकाणी हजारो किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.

पनवेलमधील पाच सफाई कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

पनवेल : बातमीदार

पनवेलमधील कोन गावाजवळ असलेल्या इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमधील पाच सफाई कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पनवेल शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडिया बुल्स गृहप्रकल्पात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. एक हजार जणांची क्षमता असलेल्या या सेंटरमध्ये सध्या 137 संशयित रुग्णांना ठेवण्यात आले आहे. येथील स्वच्छतेसाठी पनवेल महापालिकेचे सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. यातील पाच सफाई कर्मचार्‍यांमध्ये करोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांना लागण झाल्याचे उघड झाले. यातील एक सफाई कर्मचारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयातील उपायुक्तांच्या दालनात गेले होते. त्यामुळे घाबरलेल्या उपायुक्तांनी त्यांच्या दालनाचे निर्जंतुकीकरण केले.

कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर पाच कर्मचार्‍यांना इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. सध्या सफाई कामगारांची तब्येत स्थिर आहे. त्यांना तीव्र त्रास होत नाही.

-श्याम पोशेट्टी, सहाय्यक आयुक्त

शेताच्या बांधावरच बियाणांचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी असतांनाच तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गांस शेताच्या बांधावर जावून बियाणांचे वाटप करण्यात आले. गेले जवळ दोन महिने कोरोना हा विषाणू यांनी सर्वांनाच त्रस्त करुन सोडले असतांना, पावसाळी हंगामामध्ये बियाने खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र ते होवू नये यासाठी खालापूर तालुक्यातील असलेल्या गावामध्ये शेतीच्या बांधावर जावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हे बियाणे वाटप करण्यात आली. लॉकडाऊन काही प्रमाणात स्थितील करण्यात आले असले, तरी सुद्धा गर्दी अनेक ठिकाणी होत असतेच यामुळे हा कोरोना आजार निर्माण होवू शकतो तो होवू नये यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील आसरे आणि कलोते मोकाशी गावामध्ये शेताच्या बांधावर जावून, बियाणे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला. या वेळी कृषी सेवा केंद्र ग्रो सेंटर खालापूर समिर पिंगळे तसेच सुयोग्य ग्रो टेंडर्स चौक सुयोग्य जोशी यांनी स्वता या गावामध्ये येवून ही खते देण्यास सहकार्य केले. त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी एम. ए. सालके, कृषी सहाय्यक एम. एस. महाडीक, चेतन चौधरी, सी. आर. सारंग, तसेच कृषी मित्र बाळू दामू ठोंबरे, कलोते मोकाशी उपसरपंच आसरे विजय कापरेकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पोपटे आदी उपस्थित होते. या वेळी भात बियाणे म्हणून कोमल, जया अवनी, देवकी सौभाग्य आदी बियाणांचे वाटप करण्यात आले.

पनवेल परिसरातील गरिबांना वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे बंद पडली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबीयांच्या मदतीसाठी पनवेलच्या श्री साई नारायण बाबा संस्थेने धाव घेतली असून या भागातील 60 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्री साईबाबा मंदिराच्या प्रांगणात शासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगद्वारे करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कुटूंबे घरीच बसली आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची नितांत गरज असल्याची माहिती संस्थेचे राम थदानी यांना कळताच त्यांनी संबंधित कुटुंबीयांची यादी मागवून प्रांगणात सोशल डिस्टन्सिंगद्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply