नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप 4 संघ कोणते असतील याबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भविष्यवाणी केली आहे. गंभीरच्या मते, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफचे सामने खेळतील.
आयपीएल 12चे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे सार्यांना वेध लागले. 23 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सार्यांचे लक्ष असणार आहे.
आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसर्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कॅपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. 24 मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. अशा ‘हाय व्होल्टेज’ सामन्यांनी स्पर्धेची सुरुवात होणार असल्यामुळे सर्वच जण यंदाच्या स्पर्धेकडे डोळे लावून
बसले आहेत.
या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर म्हणाला, आयपीएलमध्ये एकूण आठ संघ असतात. त्या संघांमध्ये साखळी सामने होतात आणि त्यातून सर्वोत्तम खेळ करणार्या चार संघांना पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळतो. हे 4 संघ ‘प्ले ऑफ’ म्हणजेच बाद फेरीत खेळतात. त्यातदेखील पहिल्या सामन्यात पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाचा संघ एकमेकांविरोधात लढतो. त्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठतो; तर पराभूत संघ तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघात होणार्या विजेत्या संघाशी दोन हात करतो. हे चार संघ म्हणजे मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे असतील.