अलिबाग : प्रतिनिधी
रेड बुल टशन ही तळागाळातील खेळाडूंसाठीची स्पर्धात्मक कबड्डी स्पर्धा आता परतली असून, पुण्यात पश्चिम विभागातील अंतिम स्पर्धेपूर्वी पश्चिम भारतातील विविध ठिकाणी ती आयोजित केली जाणार आहे. विवो प्रो-कबड्डी लीग फ्रँचायझी असलेल्या पुणेरी पलटनच्या भागीदारीत होणार्या या स्पर्धेचे उद्दिष्ट या पुरातन आणि विशेष भारतीय खेळाची व्याप्ती वाढवणे आणि देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आहे. नॉकआऊट तत्त्वावर खेळल्या जाणार्या या फेरीच्या पात्रता फेर्या तीन शहरांमध्ये आयोजित केल्या जाणार असून, येत्या 24 मार्च रोजी अलिबागपासून त्याची सुरुवात होईल. इतर पात्रता फेर्या एप्रिलमध्ये नाशिक व कोल्हापूर येथे आयोजित केल्या जाणार आहेत आणि अंतिम फेरी पुण्यात आयोजित केली जाईल. विजेत्यांना प्रो-कबड्डी लीगचा सातवा सीझन सुरू होण्यापूर्वी पुणेरी पलटन टीमसोबत त्यांच्या होम स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.
अलिबाग क्वालिफायर्स-रेड बुल टशन पुणेरी पलटनच्या भागीदारीत अलिबाग येथील सामने 24 व 25 मार्च रोजी नेहुली जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत. प्रत्येक पात्रता फेरीतील विजेत्या टीमला कबड्डी युनिफॉर्म्सचा पूर्ण संच मिळेल आणि अंतिम फेरीत खेळण्यास आमंत्रित केले जाईल.
17-21 वर्षे वयोगटातील आणि क्लब किंवा महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या रेड बुल टशनमध्ये सामन्यांसाठी धोरण हा एक महत्त्वाचा घटक बनवण्यात आला आहे, कारण हे सामने प्रो-कबड्डी लीग सामन्यांच्या अर्ध्या कालावधीत चालतील. प्रो-कबड्डी लीगमध्ये प्रत्येक सामन्याचा अर्धा कालावधी 20 मिनिटांचा असतो; तर या सामन्यात प्रत्येक कालावधी प्रत्येकी 10 मिनिटांचा असेल. त्यामुळे खेळाचा संपूर्ण कालावधी 20 मिनिटांचा होईल.