बीड : प्रतिनिधी
कोरोना टाळेबंदीत इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्याचे आठवड्यातील दुसर्या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी (दि. 24) दुपारी उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संगीता संतोष कोकणे (वय 31) व संदेश संतोष कोकणे (अंदाजे 10) या दोन्ही मायलेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले, तर मयूर संतोष कोकणे
(7) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळला. खोलीत मृतदेहांजवळ घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. मोठा दगड आणि रक्त लागलेली क्रिकेटची बॅटही आढळून आली आहे. दगड आणि बॅटने दोन्ही मायलेकांचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती कळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आठवड्यात जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच मांगवडगाव (ता. केज) येथे शेतजमिनीच्या वादातून तिघांची हत्या झाली होती.