Breaking News

साळसूदांचे राजकारण

स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने तर सोनू सूद याने केलेली मदत ही औपचारिक आभाराच्या पलीकडची आहे. सत्ताधारी शिवसेनेला मात्र त्याच्या कामामुळे झणझणीत मिरच्या झोंबल्या. जे काम आपल्याला अजिबात जमले नाही, ते एका फिल्मी अभिनेत्याने सहजी करून दाखवले याचा प्रचंड जळफळाट सत्ताधार्‍यांमध्ये झाला. तसा तो होणे हे देखील स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

एकीकडे कोरोनाच्या लागणीची टांगती तलवार आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी. या दुहेरी संकटात सर्वाधिक परवड झाली ती हातावर पोट असलेल्या गरीब स्थलांतरित मजुरांची. त्यांची अवस्था तर आस्मान फाटले आणि सुलतानाने झोडपले अशी झाली. पोटापाण्यासाठी आपला मुलुख आणि घर सोडून दूरवर मुंबईत आलेल्या या मजुरांना अक्षरश: कुणीही वाली उरला नाही. वांद्रे रेल्वे स्थानकासमोर होणारी गर्दी, रस्त्याने चालत निघालेले मजुरांचे तांडे यांच्या बातम्या आणि दृश्ये पाहून कोणाच्याही काळजात कालवले असेल. मुंबईतील या निराधार आणि बेघर मजुरांशी फक्त गोड बोलून सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली. ते लवकरच उघड झाले. तसे ते होणारच होते. कारण या मजुरांसाठी तीन चाकी आघाडी सरकारने विशेष काहीही केले नाही. ही वस्तुस्थिती सार्‍यांनाच दिसली. अमुक लाख लोकांच्या राहण्याची सोय केली, तमुक लाख लोकांच्या भोजनाची सोय केली या बाजारगप्पांना ऊत आला होता. पण प्रत्यक्षात उघड्या डोळ्यांनी बघावे लागत होते ते उत्तरेतील मायभूमीत जाण्यासाठी धडपडणारे भुकेल्या मजुरांचे तांडे. अशा निराधारांसाठी चंदेरी दुनियेतील एक अभिनेता धावून यावा हा एक काहिसा सुखद धक्काच होता. अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या चमकदार अभिनयाने आणि बलदंड शरीरयष्टीने छाप उमटवणार्‍या सोनू सूद या अभिनेत्याने पदरचे पैसे खर्च करून या मजुरांना त्यांच्या गावी धाडण्याचा सपाटा लावला. अनेक बसेस भरून, कधी रेल्वेगाड्या आरक्षित करून, सरकार दरबारी अनेक खटपटी लटपटी करून सोनू सूद याने हजारो स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी सुखरूप धाडले आणि भरभरून दुवा मिळवली. वास्तविक राज्य सरकारने यथायोग्य पद्धतीने स्थलांतरितांचा प्रश्न सोडवला असता तर सोनू सूद सारख्या अभिनेत्याला या भानगडीत पडायचे कारणच नव्हते. आपल्या संभाव्य चित्रिकरणाची चिंता वाहात तो आपल्या घरी आरामात बसू शकला असता. परंतु संवेदनशील मनाच्या या अभिनेत्याने गप्प न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरणे पसंत केले. सोनू सूदच्या या समाजकार्याला खरोखर तोड नाही. त्याबद्दल त्याचे जितके अभिनंदन करावे तितके थोडे आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नी सपशेल तोंडावर पडलेल्या शिवसेनेची मात्र त्यामुळे चांगलीच अबू्र गेली. रविवारी संध्याकाळी सोनू सूद याला मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी बोलवून त्याची पाठ थोपटण्याचा तोंडदेखला खेळ पार पडला. परंतु ‘बूँद से गयी वो हौदसे नहीं आती’ हेच खरे. यापूर्वी सूद यांच्या सामाजिक कार्याला राजकीय लेबल लावण्याचे प्रयत्न झाले. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चांगलाच प्रतिटोला लगावला. अभिनेते सोनू सूद यांनी चांगले काम केल्यावर ते भाजपचे आहेत असे म्हटले गेले. चांगले काम करणारे भाजपमध्येच आहेत हा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे ही फडणवीसांची कोपरखळी निश्चितच दाद द्यावी अशीच आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply