अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, रोहा, अलिबाग या तालुक्यांना जास्त बसला. अन्य तालुक्यांनाही झळ पोहोचली. यामध्ये एक लाख 75 हजार घरांची पडझड झाली. त्यापैकी 15 हजार घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत, तर 18 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे सुमारे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 183 शासकीय इमारतींचेही नुकसान झाले आहे. विजेचे हजारो खांब पडल्याने आजही अनेक गावे अंधारात आहेत. वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. जेथे शक्य आहे तेथे जनरेटरच्या सहाय्याने योजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर पर्यायी जल स्त्रोतातून पाणी पुरविले
जात आहे.
ज्यांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे त्यांनादेखील मदत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरातील भांड्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भांडी खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे. मृत व्यक्तींच्या वारसांनादेखील मदत दिली जाईल, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …