Breaking News

महायुतीचा धडाका

रायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे.

सतराव्या लोकसभेच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. तिसर्‍या टप्प्यात रायगड लोकसभा तर चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने रायगडातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले आहे. रायगडमध्ये महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, तर मावळला विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना निवडणुकीत उतरविलेले आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. अर्थात दोन्हीही मतदारसंघात महायुतीच विजयी होणार असल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महायुतीच्या प्रचारासाठी रायगडात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन-चार दिवसांत रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी महायुतीचे मेळावे घेतले. शिवाय प्रचाररॅलीतही सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि भविष्यात करावयाची कामे यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप, शिवसेना, रिपाइंचे कार्यकर्ते आता करू लागलेले आहेत. उन्हाचा तडाखा वाढतोय, त्याचबरोबरच प्रचारही शिगेला पोहोचू लागलाय. त्यात कडक आचारसंहितेचे बंधन असल्याने कुठेही त्या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महायुतीचे कार्यकर्ते दक्ष राहत असल्याचे जाणवत आहे. महायुतीच्या प्रचारार्थ रायगड, मावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा, रोड शो आयोजित करण्यात आलेले आहेत. पुढील आठवड्यात या नेत्यांच्या जाहीर सभांनी रायगड, मावळ ढवळून निघणार आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने राष्ट्रवादीचे बडे नेते मावळमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. त्या मानाने काँग्रेसचे नेते या दोन्ही मतदारसंघातील प्रचारापासून दूर राहिल्याचे प्रकर्षाने जाणवते. काँग्रेसवाले अजूनही राष्ट्रवादीवर भरवसा ठेवायला तयार नाहीत. त्याचाच हा परिणाम असल्याचे महाआघाडीच्या सहभागी पक्षांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबागेत राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ तालुक्यात प्रचार रॅली काढली, पण त्या रॅलीत शेकाप सहभागी झालेला नव्हता. याचाच अर्थ अजूनही महाआघाडीत सारे काही आलबेल आहे असे म्हणणेच चुकीचे ठरेल. अर्थात अजून मतदानाला आठ-दहा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत अनेक घडामोडीही घडू शकतात. त्यावरही निकाल अवलंबून असेल.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply