खोपोली ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसल्याने हैराण झालेल्या शेतकर्यांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने काहींची तारांबळ उडाली आहे, मात्र या पावसाने शेतकरी सुखावला असून खालापूर तालुक्यातील सर्वच शेतकर्यांनी आपल्या शेतीच्या मशागतीच्या व भातपेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.
खालापूर तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा झाल्याने शेतकरीराजाने आपल्या शेतातील मशागतीच्या कामांवर जोर दिला आहे. या वर्षी मुबलक पावसाचे भाकीत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केल्याने शेतकरीराजा उत्साही आहे. भातशेतीच्या कामांनी खालापूर तालुक्यात जोर धरल्याने शेतकरी आपल्या शेतीकामात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
खालापुरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असली तरी तालुक्यातील केळवली, वणी, बीडखुर्द, जांबरुंग, जांबरुंग ठाकूरवाडी, खरवई, नावंढे, घोडीवली, माणकीवली, नवघर, आंजरुण, सांगडे, ठाणेन्हावे, उंबरे, चौक, तुपगाव, आसरोटी, कोपरी, सावरोली, स्वाली, खानाव, उंबरे, कलोते, नडोदे, निगडोली, वावोशी, छत्तीशी विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, पंचायत समिती तालुका कृषी विभागाकडून शेतीसहाय्यता व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात अधिकारीवर्ग राब टाकणे, बियाणे, रोप व इतर तांत्रिक आणि शासकीय योजनांची शेतकर्यांना माहिती देतील.