Breaking News

कोरोनाविरुद्ध केंद्राने कंबर कसली; मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार अधिक सुधारणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता राज्यांसह एकत्रितपणे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अधिक सुधारणा करणार आहे. यानुसार ज्या शहरांमध्ये जास्त कोरोनाबाधित आहेत अथवा शेकडो हॉटस्पॉट्स आहेत अशा शहरांवर प्रामुख्याने लक्ष राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी

(दि. 14) घेतलेल्या समीक्षा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावरील उपचार आणि व्यवस्थापन अधिक चांगले कसे करता येईल या संदर्भातही या वेळी चर्चा झाली.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा वेग असाच वाढत राहिला, तर भारताची स्थिती अमेरिकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. भारतावर अमेरिकेसारखी परिस्थिती येऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि कन्टेन्मेंट स्ट्रॅटजी प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने समीक्षा बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या वेळी नीती आयोगाचे सदस्य आणि मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंट प्लॅनच्या ग्रुपचे विनोद पॉल यांनी सध्याची स्थिती आणि संभाव्य स्थितीसंदर्भात प्रेझेन्टेशन सादर केले.

या बैठकीत दिवसागणिक वाढणार्‍या रुग्णसंख्येचा विचार करता बेड्सची संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी शहर आणि जिल्ह्यांतील रुग्णालये, आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भात माहिती घेतली. त्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला आदेश दिले.

-पंतप्रधानांनी घेतला आढावा

भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीसह विविध राज्यांमध्ये कोरोना साथीची स्थिती कशी आहे, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध किती प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत, किती उद्योगधंदे सुरू झाले अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत घेतली.

-दिल्लीसाठी गृहमंत्री अमित शहा यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर दिल्लीला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शहा यांनी अ‍ॅक्शन प्लॅनची घोषणा केली आहे.

या संदर्भात माहिती देताना अमित शहा यांनी सांगितले की, देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पुढील दोन दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून दुप्पट, तर सहा दिवसांनंतर हे प्रमाण तिप्पट केले जाईल. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कन्टेन्मेंट झोनमधील प्रत्येक केंद्रावर कोविड-19चे तपास केंद्र सुरू केले जाईल. तसेच संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे 500 कोच उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही अमित शहा यांनी दिली

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply