पनवेल : वार्ताहर
आकुर्ली येथे नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात आले. 20 एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्रामुळे पनवेल शहरालगत असलेल्या सुकापूर, आकुर्ली, नेरे तसेच माथेरानच्या पायथ्यापर्यंत असणार्या सर्व ग्रामीण भागांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे, असे महावितरणचे अधिकारी जयदीप नानोटे यांनी सांगितले. नुकताच सुरू झालेला पाऊस तसेच होवून गेलेले निसर्ग चक्रीवादळाने पूर्ण राज्यात महावितरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरीही पनवेलमधील वीज पुरवठा कमीतकमी काळ बंद ठेवून युद्ध पातळीवर कामे करण्यात पनवेल महावितरणाने भर दिला. पनवेल शहराप्रमाणेच आकुर्ली येथे सुरू केलेल्या या 20 एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्रामुळे आकुर्ली, सुकापूर ते माथेरानच्या पायथ्यापर्यंत असणार्या सर्व ग्रामीण भागाला याचा फायदा होणार असून अखंडीत वीज पुरवठा नागरिकांना मिळणार आहे.