पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई : प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर गायब असलेल्या राठोड यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण ही तरुणी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील वानवडी भागात ती वास्तव्याला होती. 8 फेब्रुवारी रोजी पूजाने इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर गेले काही दिवस या अनुषंगाने 10 ते 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून, त्यातून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या क्लिप्समध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे संभाषण असून, तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपने हा मुद्दा उचलून धरत राठोड यांच्या राजीनामाच्या मागणी केली होती. अखेर राठोड यांनी मंगळवारी (दि. 16) ‘मातोश्री’वर राजीनामा सोपवल्याची चर्चा आहे, मात्र राठोड किंवा शिवसेनेने या संदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेले वनमंत्री संजय राठोड गुरुवारी (दि. 18) पोहरादेवी गडावर येणार आहेत. तिथे ते मौन सोडतील, अशी शक्यता आहे.
‘केवळ राजीनामा पुरेसा नाही, गुन्हा दाखल करून अटक करा’
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड आणि शिवसेनेला खिंडीत गाठले होते. विरोधक तसेच इतर माध्यमातून वाढत असलेल्या दबावामुळे राठोड यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वनमंत्री संजय राठोड यांनी पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा, तसेच केवळ राठोड यांचा राजीनामा पुरेसा नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी.
शिवसेनेत दोन गट
मंत्री संजय राठोड यांच्या राजीनामाम्यावरून शिवसेनेत दोन गट पडले आहेत, तर पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी ’वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरू आहे. राजीनाम्यावरून पक्षात दोन गट पडल्याचे दिसते आहे. आधीपासूनच राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात खासदार भावना गवळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनाम्याबाबत पुढील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. कारण एकाने ’मारल्यासारखं करायचं, दुसर्याने रडल्यासारख करायचं’, असं होता कामा नये, तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता, विधान परिषद, महाराष्ट्र
मंत्रिमहोदय आहेत कुठे?
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या 22 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आठ दिवस उलटून गेले तरी राठोड यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे राठोड सध्या नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे गायब झालेत, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची व कारवाईची मागणी भाजपने लावून धरली आहे. सध्या राठोड यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव गोवण्यात आल्यापासून राठोड हे मंत्रालयातील त्यांच्या दालनातदेखील आलेले नाहीत. मग ते कुठे दडून बसलेत याचा ठावठिकाणा कुणालाही नाही.