
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याचे भाव अचानक गडगडले आहेत. कांदा अगदी कवडीमोलाच्या भावाने विकला जाऊ लागला आहे. आज तर कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली. आतापर्यंतचा दुसरा निचांकी स्तर कांद्याने गाठला. ग्राहकांसाठी सुखद तर व्यापारी व कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी हिरमोड करणारी ही घसरण आहे.
वाशी मार्केट येथे कांद्याचा घाऊक दर तीन रुपये प्रति किलो इतका खाली आला. या मोसमातील हा सर्वात कमी दर ठरला. तर आजवरचे दर पाहता हा दुसरा निचांकी दर असल्याचे सांगण्यात आले. कांद्याचे दर गडगडल्याने व्यापारी व शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घाऊक बाजारात आज कांद्याचा किलोमागे कमीत कमी दर तीन ते चार रुपये इतका होता. मध्यम आकाराच्या कांद्याचा भाव पाच ते सात रुपये तर मोठ्या आकाराच्या कांद्याचा भाव 8 ते 10 रुपये इतका होता, असे व्यापार्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ज्या तुलनेत आवक सुरू आहे त्या तुलनेत कांद्याची मागणी नाही. त्याचा फटका बसून कांद्याचे भाव घसरत चालले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही घरसण सुरू आहे. आज दरांनी निचांकी स्तर गाठला. मागणी वाढली नाही तर येत्या काही दिवसांत दरांमध्ये आणखी घसरणा पाहायला मिळू शकते, असेही बोलले जात आहे.