Breaking News

रिलायन्स टाऊनशिप परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पाली ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. परिणामी या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथील बी-150मधील रूम नं. बी-149 ते बी-152 रूमपर्यंतचे क्षेत्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

मुरूडच्या स्विचिंग सेंटरमध्ये वीजपुरवठा; अंतर्गत दुरुस्तीच्या कामाला वेग

मुरूड ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात मागील 17 दिवसांपासून वीज गायब आहे. वादळामुळे पोलवर मोठमोठे वृक्ष, तर काही ठिकाणी वार्‍याच्या वेगामुळे पोल वाकले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा वीज मंडळाला मोठा फटका बसला आहे. पाबरे येथून मुख्य वाहिनी दुरुस्त करण्यासाठी वीज मंडळ मेहनत घेत होते. आता ते काम पूर्ण झाले असून पाबरे ते दत्तमंदिर स्विचिंग सेंटर येथे वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती वीज मंडळाने दिली आहे.

स्विचिंग सेंटरला वीजपुरवठा झाल्याने आता मुरूड शहराला वीजपुरवठा करणे सोपे जाणार आहे. मुरूड शहरातील दुरुस्तीच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे. सर्व पाखड्यांमध्ये वीज कर्मचारी पसरले असून विजेची दुरुस्ती करण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिक व नगरसेवकसुद्धा मदत करताना दिसत आहेत. नगरसेवक विजय पाटील, समाजसेवक अरविंद गायकर, माजी नगरसेवक प्रकाश सरपाटील हे विशेष लक्ष देत असून वीज कर्मचार्‍यांना मदत करताना दिसत आहेत. मुरूड शहरातील बहुसंख्य पाखड्यांमध्ये खूपशी तुटफूट झाली आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. याबाबत मुरूड शहर अभियंता कीनगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्विचिंग सेंटरला वीजपुरवठा झाला आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत मुरूड शहराचा वीजपुरवठा पूर्ववत होईल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply