आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा प्रशासनाला सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची आयुक्तांसमवेत त्यांच्या दालनात बैठक झाली. या शिष्टमंडळात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमर पाटील, संतोष भोईर, मुकीद काझी, नगरसेविका रुचिता लोंढे आदींचा समावेश होता.
या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे असे सूचित करून याबाबत काय उपाययोजना करायला हव्यात यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात तसेच मुस्लिम समाजात कोरोनाबद्दल जागृती, ग्रामपंचायतीमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचार्यांना वेतनवाढ द्यावी, महापालिकेत पुरेसे नसलेले मनुष्यबळ आदी विषयांवरही चर्चा झाली. सर्व विषयायांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कोरोनाचे संक्रमण
पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. सुरुवातीच्या काळात शहरी पट्ट्यात रुग्ण आढळत होते, पण आता ग्रामीण भागातही रुग्णांची भर पडत आहेत. रायगड जिल्ह्यात दर दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद पनवेल तालुक्यात होत असल्याने चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.