Breaking News

कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना पैसे परत कधी मिळणार?

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रशासकाला सवाल

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि. 24) कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने प्रत्यक्ष बँकेत जाऊन आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती घेतली. या वेळी त्यांनी बँक प्रशासक श्री. मावळे यांना बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, असा खडा सवाल केला.
या संदर्भात कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत माहिती देताना समितीचे उपाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कर्नाळा बँकेच्या सर्व खातेदार व ठेवीदार यांना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. हा पाठपुरावा करीत असताना आम्ही माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), सहकार खाते, पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी भेटी घेऊन आढावा घेतला. कोरोनाच्या संक्रमण काळात 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने मधल्या काळात पोलीस प्रशासन आणि सहकार खाते यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनलॉक सुरू झाल्यापासून आम्ही पुन्हा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पाठपुराव्याचा एक भाग म्हणून कर्नाळा बँकेचे प्रशासक श्री. मावळे यांची मी, आमदार महेश बालदी, नगरसेवक नितीन पाटील व सहकार्‍यांनी आज बँकेत जाऊन भेट घेतली आणि ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार, याचे लेखी उत्तर त्यांच्याकडे मागितले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी या बँकेतून कर्जे घेतली व बुडविली त्यांच्यावर बँक काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे 101 वसुली दाव्यांबाबत 70 प्रकरणांच्या चौकशीचा बँकेने आरंभ केला आहे. त्यात प्रगती दाखवावी, असे सूचित केले. मधल्या काळात बँकेच्या कुणीतरी पाच लाखांच्या आतील ठेवी ठेवल्यास इन्शुरन्स मिळू शकतो असे सांगितल्याने अनेक जणांनी त्यांच्या ठेवी पाच-पाच लाख लाख रुपयांच्या स्वरूपात ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत प्रशासकांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होते ते त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे या संदर्भात खुलासा करावा, अशीही आमची मागणी आहे.
आरबीआयने कर्नाळा बँकेतून 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यास निर्बंध घातल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. या सर्व बाबतीत मार्ग काढण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या मागे लागणार आहोत. एकीकडे ज्यांनी हे पैसे बुडविले ते बँकेचे अध्यक्ष शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील व बँकेच्या संचालकांवर कारवाई करून त्यांनी पैसा कुठे दडविला आहे त्याचा छडा लावून तो पैसा ठेवीदारांना परत देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, मात्र यावर कारवाई होत नाहीए. पोलीस आयुक्तांशी आमचे बोलणे झाले असून, कारवाईला आम्ही सुरुवात करू, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले. हे आश्वासन लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे; अन्यथा ठेवीदार आज आमच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. येणार्‍या काळात शासनाकडे पाठपुरावा करून याबद्दल कृती करण्यास आम्ही भाग पाडू, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply