माणगाव ः प्रतिनिधी
रायगडात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. आता सरकारी कार्यालयांकडे कोरोनाने आपला मोर्चा वळविला. रायगड जिल्हा परिषदेपाठोपाठ तालुक्यातील तहसील कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वार्डबॉय यांच्यानंतर आता तहसील कार्यालय माणगावमधील एका शिपायाचा तसेच खांदाड माणगावमधील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील हेदमलई येथील एका रुग्णाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. असे तीन नवे रुग्ण तालुक्यात आढळले. तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने विविध कामानिमित्त येणार्या लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्व उपाय शासन व प्रशासनाकडून करण्यात येत असूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने रायगडवासीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
माणगावात आता कोरोनाबाधितांची संख्या 15वर पोहचली आहे. तालुक्यातील जवळपास 27 गावांतून आतापर्यंत 71 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 55 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदापूरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्यसेवेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच सरकारी कार्यालयात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वांनीच धास्ती घेतली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयातील शिपायाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने येथील कर्मचार्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या कर्मचार्यांचे काम कार्यालयाच्या आतमध्ये सुरू राहणार असून बाहेरील व्यक्तींना शुक्रवारपर्यंत आत घेतले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनाबाधित शिपायाच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.