कर्जतमध्ये 16 जण बाधितर
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्याला बसलेला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरच्या पुढे गेली आहे. त्यात आता किरवली ग्रामपंचायत हद्दीतील बोरवाडीत झालेले उत्तरकार्य महाग पडले आहे. या उत्तरकार्यात सहभागी झालेल्यांपैकी 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
कर्जत शहराला लागून असलेल्या बोरवाडी गावात एका नामवंत व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्या व्यक्तीचा दशक्रिया विधी तसेच उत्तरकार्य 18 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले होते त्यांच्यातील 61 वर्षीय महिलेचा कोरोना टेस्टचा अहवाल 25 जून रोजी पॉझिटिव्ह आला, तर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या अनेक लोकांनाही त्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे 25 जून रोजी 45 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यातील 16 जण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्यात बोरवाडीसह कर्जत भिसेगाव, दहिवली, डिकसळ, वंजारवाडी आणि चोरावळे येथील नातेवाईकांचा समावेश आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यामध्ये शनिवारी दिवसभरात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 113वर जाऊन पोहोचली आहे.