शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान
सातारा : प्रतिनिधी
भारत-चीनदरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडले होते, याचाही विचार केला पाहिजे. 1962च्या युद्धानंतर चीनने भारताचा 45 हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत पवार यांनी राहुलबाबांचे कान टोचले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (दि. 27) सातार्यात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन संघर्षावरून सत्ताधारी आणि काँग्रेसदरम्यान सुरू असलेल्या वाक्युद्धावरही त्यांनी भाष्य केले. या वेळी त्यांनी राहुल गांधी यांचे कान उपटतानाच भूतकाळातील घटनांचे दाखलेही दिले. जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडले याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असा सल्ला पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला.
चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोर्यात कुरापती काढली हेही खरे आहे, मात्र असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले तसेच उभय देशांतील जवानांमध्ये झटापट होते, याचा अर्थ तुम्ही जागरूक होता असा होतो. नाही तर चिनी सैन्य कधी आले आणि गेले हे कळलेही नसते, असेही ते म्हणाले.