पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा व महत्त्वाचा क्षण… या वेळी सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावावी, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असते, पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. या नियमांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.
शासनाच्या महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने 31 मेच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी दिली आहे तसेच याच मर्यादेत खुले, लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह येथे लग्न समारंभास परवानगी देण्यात येणार आहे.
- परवानगी आवश्यक
लग्नसमारंभासाठी विनंती अर्ज प्राप्त झाल्यास या अर्जाच्या अनुषंगाने कोविड-19चा प्रादूर्भाव रोखण्याच्या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळून लग्नसमारंभात परवानगी देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांनी आयुक्त, तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीने लग्न समारंभ कार्यक्रम होतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.