कर्जत : बातमीदार
नेरळमध्ये शुक्रवारी (दि. 3) सकाळी एक नवजात बालक आढळल्याची घटना घडली. पोलिसांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून, त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत.
मूल नाही म्हणून अनेक दाम्पत्य मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, तसेच डॉक्टरांकडे नाना उपाय करीत असतात. त्यांची बाळासाठीची धडपड पाहून हृदय पिळवटून निघते, मात्र कर्जत तालुक्यात याउलट एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने मातृत्वाला काळिमा फसला गेला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कोंबळवाडी येथे शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास एका बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने जवळील चाळीतील लोकांनी शोध घेतला. तेव्हा खड्ड्यात अंगावर काहीच वेळापूर्वी जन्मलेले एक बाळ आढळून आले. त्या बाळाच्या अंगावर मुंग्या चढून त्याचा चावा घेत होत्या. त्या वेदनेने ते बाळ कण्हत होते. हे दृश्य पाहताच तेथील आशा रुके या महिलेने तत्काळ घरातील कपडा आणून त्या बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या व रक्त पुसून काढले तसेच नेरळ पोलिसांना याबाबत कल्पना देऊन त्यांच्या मदतीने बाळाला दवाखान्यात दाखल केले.
या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार उपनिरीक्षक तात्या सवांजी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या बाळाला आपण सांभाळू अशी भूमिका आशा रुके व त्यांचे पती विनोद रुके यांनी घेतली आहे. शासकीय नियमांची पूर्तता करून आपण त्या बाळाला दत्तक घेऊन त्याचे संगोपन करू, असेदेखील रुके दाम्पत्याने म्हटले आहे.