Breaking News

महाराष्ट्राचे लोकनेते ‘सेल्फ मेड मॅन’ देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर अवघ्या देशाला माहिती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे. नेतृत्व कौशल्य आहे. राजकीय कुशाग्रता आहे तसेच हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा आहे. लोकांचा लोकनेता होण्यास, याव्यतिरिक्त अजून काय हव असतं? त्यामुळेच ते पुन्हा यावेत, ही अवघ्या महाराष्ट्राची इच्छा होती. देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) रोजी वाढदिवस आहे.

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी राजकारणात आलेला एक तरुण, नगरसेवकपदापासून आपली राजकीय-सामाजिक कारकीर्द सुरु करतो. पुढे वयाच्या 27व्या वर्षी स्वकर्तृत्वाने नागपूर शहराचा महापौर होतो आणि वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचा तरुण तडफदार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो. ही गोष्ट आहे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची! त्यांच्या जिद्दीची आणि कार्य कुशलतेची! स्वकर्तृत्वाने आणि मेहनतीने नवं महाराष्ट्राचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन देवेंद्र जी, 2014 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आजच्या परिस्थितीत ते राज्याचे लोकनेते आहेत. त्यामुळे देवेंद्र जी खर्‍या अर्थाने सेल्फ मेड मॅन आहेत, हेच स्पष्ट होते.

राजकारणात असणार्‍या व्यक्तींना राजकारण आणि समाजकारण यामध्ये साधर्म्य साधता येणे खूप गरजेचे असते. एकाचवेळी राजकारण आणि समाजकारण करू शकणारे व त्याच जिद्दीने पुढे जाणारे राजकीय व्यक्ती खूप कमी असतात. यामध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना, एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड देऊन, सर्व अग्नीपरीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याची सचोटी पार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आजच्या घडीला उपमुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राच्या विकासाचे कार्य पुढे घेऊन जात आहेत.

2014 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ पाच वर्षांत जो व्यक्ती जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्राला विकासाचा नवा दृष्टीकोन देऊ शकतो, तो व्यक्ती या पुढील काळात देखील नवं महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये नक्कीच मोलाचा सहभाग नोंदवेल यात तिळमात्र शंका नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे एक अस रसायन आहे, जिथे त्यांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा राजकीय, सामाजिक व आर्थिक दृष्टिकोन एकत्रित काम करत असून देखील संयम, त्याग आणि आत्मविश्वास या सर्व गुणांनी ते स्वयंभू व स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आजवर असा लोकनेता लाभलेला नाही, आणि यापुढील काळात देखील लाभेल असे वाटत नाही.

विकासाचे राजकारण करत असताना, होत असलेला विकास हा लोक सहभागातून साधायचा असतो. त्यासाठी एक लोकचळवळ उभी करणे गरजेचे असते. लोकांमध्ये विकासासाठीची ओढ निर्माण करणे आवश्यक असते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हे गुण प्रकर्षाने दिसून आले. 2014 सालानंतर महाराष्ट्र सरकारच्या योजनांपैकी बहुतांश योजना या लोकसहभागातून नावारूपास येणार्‍या योजना होत्या. त्यामुळेच लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य, या लोकशाहीच्या व्याख्येस साजेसे काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते. ज्यात जलयुक्त शिवार योजना सर्वात यशस्वी योजना ठरली!

अंत्योदयाची संकल्पना दृढ करत असताना समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा. याकरिता विकासाचे माध्यम म्हणून सरकारने काम करावे. शहरांबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास व्हावा. शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा!, पर्यटन क्षेत्राची भरभराट व्हावी. भारतीय संस्कृतीची सार्‍या जगाला माहिती व्हावी. ही भाजपनेतृत्वाची सदैव नीती राहिलेली आहे. यामध्ये विकास पुरुष म्हणून भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी जी आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. पक्ष नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी देखील हीच नीती वापरून महाराष्ट्रातील विकासकामे हाती घेतली आहेत. ज्यामध्ये जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, सेवा हमी कायदा, ओबीसी विभागाला दिलेले प्राधान्य, बुलेट ट्रेन, मेट्रोसारखे प्रकल्प अशा विविध विकासकामांना आजवर प्राधान्य देण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती पारदर्शक असून उत्तरदायित्वाच्या मूल्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक कामांमधून हे दिसून येते. पारदर्शकता, सुशासन, सर्वसमावेशकता, अभ्यासपूर्ण मांडणी आणि कामामध्ये गती या मूल्यांचा विचार करून, ते कामे करतात. अशाप्रकारे कामे करणार्‍या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना देखील ते नेहमी प्रोत्साहन देतात. राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्यापासून छोट्यागोष्टींपासून  मोठ्यात मोठ्या विषयांमध्ये ते स्वतः लक्ष घालतात. राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील मुंबईतील नालेसफाईची माहिती ठेवणे यापासूनते ‘मेक इन महाराष्ट्र’ यासारख्या कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंतच्या सर्व विषयांमध्ये त्यांचे बारकाईने लक्ष होते.

आपला लोकप्रतिनिधी, दिलेली आश्वासने पूर्ण करू शकेल का? याबाबत 2014 सालापूर्वी जनता संभ्रमात होती. परंतु लोकांचा हाच अविश्वास दूर करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी ‘सेवा हमी कायदा’ आणि शेतकरी कर्जमाफीतील पारदर्शकता यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची मने जिंकली. आजच्या घडीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची विकासाची हीच घोडदौड सुरू आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ व्हावे, यासाठी केवळ आंदोलन उभारले गेले नव्हते,तर एक लोकचळवळ उभी राहिली होती.हा भूमिपुत्रांना लढा होता. याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना होती. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यापूर्वी वर्ष लोटली, परंतु स्थानिकांच्या भावनांना आत्ता न्याय मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनभावनेचा आदर करून लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या नेतृत्वाला-कर्तृत्वाला महाराष्ट्र सरकारकडून खर्‍या अर्थाने मानवंदना दिली आहे. स्थानिकांच्या लढ्याचा साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो.

युती सरकार सत्तेवर असताना, राज्यातील प्रत्येकाला हे माझं सरकार आहे, असं वाटतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने पोषक अशी एक लोकचळवळ उभी राहिली असून, याचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम राहतात. वेळोवेळी त्यात योग्य ते बदल करून निर्णयही घेतात. त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटांचा संधी म्हणून वापर करतात. प्रत्येक संकटातून ते नव्याने काहीतरी शिकले आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे सरकार अखंडितपणे पाच वर्ष चालवून दाखवले. विरोधी पक्ष नेते म्हणून देखील, त्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप पाडली. त्याचप्रमाणे जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील त्यांची रणनीतीदेखील महत्त्वाची ठरली.

कोणताही पक्ष अथवा संघटना एका रात्रीत मोठी होत नसते. आज देशात किंवा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे जे प्राबल्य दिसत आहे, त्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील विस्ताराचा विचार केल्यास अनेक ज्येष्ठ नावं डोळ्यासमोर उभी राहतात. पण यातही अद्भुत असे यश मिळवणारे एकच नाव आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस! देवेंद्रजींची रणनिती आणि विकासाचा दृष्टिकोन यामुळेच आजच्या घडीला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत भाजपचे संघटन पोहोचले आहे, हे विसरून चालणार नाही!

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता, मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा नेता, महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी असणारा नेता, राजकारणाकडे समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहणारा नेता, सत्तेला जनसेवेचे साधन मानणारा नेता तसेच लोककल्याणाचे शिवधनुष्य पेलणारा नेता, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही! त्यांना आई तुळजा भवानी उदंड आणि निरोगी आयुष्य प्रदान करो, याच सदिच्छा आहेत.

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

-राम प्रहर टीम

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply