Breaking News

राज्य सरकारने मनपांशी समन्वय साधावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना

पनवेल : प्रतिनिधी
राज्य सरकारने कोविड-19 नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकांना एका नव्या पैशाचीही मदत केली नाही. आरोग्य यंत्रणा सरकारच्या नियंत्रणात असल्या तरी महापालिकांवर त्याचा मोठा बोजा पडत आहे. मोठ्या महापालिका तो खर्च पेलू शकतात, मात्र लहान महापालिकांची अडचण होत आहे. ते पाहता राज्य सरकारने महापालिकांशी समन्वय राखून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन केले पाहिजे, अशी मागणीवजा सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी
(दि. 4) येथे केली.
पनवेल महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी आयुक्त आणि रुग्णालय अधीक्षकांकडून कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपचाराबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्था, रुग्णांवर होत असलेले उपचार या संदर्भातील अडचणींचा आढावा घेतला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी पनवेल महापालिकेत जाऊन कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयात अधिकचे रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपत आलेली आहे. त्यामुळे आणखी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
जून महिन्यात पनवेल परिसरात जवळपास 45 टक्के रुग्ण वाढले तसेच मृत्यूचा दर 6.4वर पोहोचला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी तपासण्या, आयसोलेशन तसेच उपचार व्यवस्थेत वाढ होणे महत्त्वाचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महापालिकेकडे आरोग्य यंत्रणा कमी पडते. त्यासाठी राज्य शासनाने लक्ष देऊन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला 10 व्हेंटिलेटर हवे आहेत. ते लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या दौर्‍यात मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अशोक दूधे, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार डॉ. अमित सानप, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले उपस्थित होते.
निश्चित धोरण हवे
लॉकडाऊनच्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. आर्थिक व्यवहार महत्त्वाचे आहेत, पण ते संकटात आहेत. ते ध्यानात घेऊन सरकारने यापुढे धोरण निश्चित करायला हवे, असे या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. यंत्रणेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply