Breaking News

अनफिट लिओनेल मेस्सीची माघार; मोरोक्कोविरुद्धचा सामना खेळणार नाही

ब्यूनस आयर्स : वृत्तसंस्था

2018 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर लिओनेल मेस्सी पहिल्यांदाच अर्जेटिना संघाकडून खेळला, पण या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून 1-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. याच सामन्यात मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मेस्सीला आता पुढील आठवड्यात मोरोक्कोविरुद्ध होणार्‍या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याला मुकावे लागणार आहे.

रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर मेस्सीवर आठ महिन्यांची बंदी असल्यामुळे तो सहा मैत्रीपूर्ण सामन्यांत अर्जेटिनाकडून खेळू शकला नव्हता. आता दुखापतीमुळे त्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाच्या सामन्यात खेळता येणार नाही. अर्जेटिना फुटबॉल महासंघाने मेस्सीच्या दुखापतीविषयीची माहिती दिली आहे. गोंझालो मार्टिनेझ यानेही पायाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. ब्राझीलमध्ये जून-जुलै महिन्यात होणार्‍या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू असून, मंगळवारी (दि. 26) मोरोक्को-अर्जेटिना यांच्यात होणार्‍या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेस्सीने या सामन्यातून माघार घेतली असली तरी 10 एप्रिल रोजी मँचेस्टर युनायटेडविरुद्ध होणार्‍या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात मेस्सी बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणूनच त्याला मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात खेळविण्यात येणार नाही.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply