कर्जतमध्ये शिष्टमंडळाचे महावितरणला निवेदन
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात लॉकडाऊन काळामध्ये वीज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, वाढीव बिले तातडीने रद्द करून नवीन बिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन केली आहे. या संदर्भात निवेदनही देण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तीन महिने लॉकडाऊन असल्याने सामान्य जनतेला रोजगारदेखील नव्हता. परिणामी सर्वांचे आर्थिक बजेट कोलमडले. अशात महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ बिले आकारली आहेत. मागील महिन्यात तर कोणत्याही ग्राहकाच्या घरी जाऊन मीटर रिडींग न घेता अंदाजे बिले बनवून ती ग्राहकांना पाठवून देण्यात आली. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले वीज ग्राहक आणखी अडचणीत आले आहेत. याचा विचार करून नागरिकांना आलेली वाढीव बिले तातडीने दुरुस्त करून द्यावीत तसेच ही बिले दोन-तीन हप्त्यांत भरण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणी कर्जत भाजप मंडलच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.
भाजपच्या वतीने वीज ग्राहकांच्या बिलासंदर्भातील मागणीचे निवेदन महावितरणचे कर्जत येथील उपअभियंता आनंद घुले यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, नगरसेवक बळवंत घुमरे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मंदार मेहेंदळे, गायत्री परांजपे, सूर्यकांत गुप्ता, मयूर शितोळे, हरिश ठाकरे यांचा समावेश होता.