महाड : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाड बंद हा उपाय नसून, हा बंद त्वरित शिथिल करावा आणि कडक जिल्हाबंदी लागू करून पोलीस नाकाबंदीही अधिक कडक करा, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
महाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, मात्र ठराविक मंडळी आणि व्यापार्यांनी मिळून आठ दिवस महाड बाजारपेठ बंदीचा निर्णय सर्वसामान्यांवर लादला. याला काही छोटे व्यापारी, व्यावसायिक विरोध करीत आहेत. या लादलेल्या बंदच्या विरोधात महाड भाजप पुढे आला आहे. तीन महिन्यांचे लॉकडाऊन, चक्रीवादळ यामुळे सर्वसामान्यांचे खूप नुकसान झाले आहे. हातगाडी, टपरीवाले, छोटे दुकानदार, बाजारपेठेत काम करणारे मजूर-कामगार यांची आधीच उपासमार सुरू झाली होती. या बंदमुळे पुन्हा या लोकांची परवड होणार आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामूणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, महेश शिंदे, आप्पा सोंडकर, शैलेश बुटाला, गणेश फीलसे, सुहास कुडपाने यांनी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन देत हा अशासकीय बंद शिथिल करण्याची विनंती केली तसेच रायगड जिल्हाबंदी उठविल्यामुळे एमआयडीसी आणि तालुक्यात बाहेरून येणार्यांची संख्या वाढल्याने कोरोनाची लागण वाढली आहे. म्हणून पुन्हा सक्तीची आणि कडक जिल्हाबंदी करावी आणि नाकाबंदी करून विनामास्क, विनाकारण भटकणार्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई व्हावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …