फडणवीस यांचा सत्ताधार्यांना टोला
जळगाव ः प्रतिनिधी
सत्ताधारी घरी बसले आहेत. त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौर्यावर कितीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणीतरी आमचे दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, तर आम्ही जनतेकरिता राजकारण करतो, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हाणला. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 9) जळगाव दौर्यावर आले असता विरोधी पक्षनेते फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस यांनी सुरुवातीला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांसह जिल्ह्यातील भाजपचे आमदार उपस्थित होते. या वेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत आढावा घेतला, तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना टेस्टिंग वाढविण्याबाबत सूचना केल्या.
नॉन कोविड रुग्णांची समस्या मोठी
जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांपेक्षा बिगर कोविड रुग्णांची समस्या मोठी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शासकीय रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय असल्याने नॉन कोविड रुग्ण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले जातात. तेथे त्यांचे हाल होतात, तसेच मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्याची माहितीही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिली.