Breaking News

खारभूमी कार्यालय नागरिकांसाठी खुले

मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्सची धडक

मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील खारभूमी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत होती. ही बाब समजताच मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्स संस्थेच्या सदस्यांनी खारभूमी कार्यालयात धडक देऊन ते सर्वांसाठी खुले केले.

खारभूमी कार्यालयात कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रवेश करू नये. आपली पत्रे, टपाल आदी बाहेरूनच स्वीकारली जातील. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सहकार्य करावे, असे लिखाण करून ते कार्यालयासमोर लावण्यात आले होते. आम नागरिकांना कोरोनामुळे कार्यालयात येण्याकरिता प्रवेश बंदी करण्यात आल्याने तालुक्यातून येणार्‍या नागरिकांची काम होत नव्हती. नागरिकांना अधिकार्‍यांशी बोलता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना काम न होताच हाताश होऊन घरी परत जावे लागत होते. ही बातमी मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांना कळताच त्यांनी खारभूमी कार्यालयाला

धडक देऊन अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला.

या वेळी अ‍ॅक्टीव्ह मेंबरचे सदस्य ललित जैन यांनी येथील अधिकार्‍यांना विचारले की, जिल्हाधिकारी कोरोनाला न घाबरता रात्रंदिवस काम करीत आहेत, मात्र तुम्ही कोरोनला घाबरून ऑफिसमध्ये येण्यास नागरिकांना मज्जाव करता. तुमचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही. बाकी कर्मचारी कधीही ये-जा करीत असतात. वास्तविक नागरिक आपल्या कामाकरिता तालुक्यातून येत असतात. त्यांना परत न पाठवता सहकार्य करणे जरूरी आहे. आधिकार्‍यांनी नागरिकांना चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती, परंतु असे होताना दिसत नाही. हे अजिबात चालणार नाही.

श्रीकांत सुर्वे यांनी शहरातील मिळकतीवर बोजा चढवून नागरिकांना खड्ड्यात टाकण्याचे काम या खारभूमीमार्फत केले गेले आहे. आता लवकरात लवकर मिळकतीवरचा बोजा कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

बोजासंदर्भात विचारणा केली असता, हे शिक्के तहसील कार्यालयातून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती इ. जी. म्हात्रे यांनी दिली, तर पैसे नसल्यामुळे सॅनिटायझर आणता आले नाही, असे कार्यालयातून सांगण्यात आले. या वेळी अ‍ॅक्टीव्ह मेंबरचे सदस्य कुणाल सतविडकर, प्रेशित दांडेकर, स्वप्नील चौलकर, अरविंद गायकर, अ‍ॅड. रूपेश पाटील, आकाश खोत हेही उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असल्याने आमच्या कार्यालयात जास्त गर्दी होऊ नये म्हणजेच ज्याचे काम आहे त्यांनीच कार्यालयात प्रवेश करावा या उद्देशाने आम्ही प्रवेशबंदी केली होती. एकाचे काम असते व त्याच्यासोबत अनेक लोक येत असतात. यावर प्रतिबंध व्हावा म्हणून आम्ही तसे केले होते,परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आम्ही आता कार्यालय खुले केले आहे.

-संजीव कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, मुरूड खारभूमी विभाग

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply