कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार झाली. त्यात दिलासादायक बाब अशी की, तीनशेहून जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. त्यातील कर्जत महावीर पेठेत कोरोना झालेला पहिला व्यापारी रुग्ण कोरोनावर मात करून घरी आल्यावर त्याच्या व्यापारी मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कर्जत शहरातील महावीरपेठमध्ये किराणा मालाचा होल सेल व्यवसाय करणार्या 53 वर्षीय राजेंद्र परमार या व्यापार्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट 15 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. कर्जतमध्ये महावीरपेठेतील व्यापार्याला कोरोना होण्याचा ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण महावीर पेठेत घबराट पसरली होती. तो उपचारार्थ पुणे येथील त्यांच्या जय जिनेंद्र केंद्रात दाखल झाला. तेथे दहा दिवस उपचार घेऊन व अगदी नियोजनबद्ध दिनचर्ये मुळे कोरोनावर यशस्वी मात करून पुण्याहून घरी आला. त्यावेळी त्याच्या रणजीत जैन, साजन ओसवाल, सुभाष सोलंकी, जितेंद्र परमार, सागर ओसवाल, दिनेश जैन, प्रमोद परमार, महेंद्र चव्हाण, पंकज ओसवाल आदी व्यापारी मित्रांनी त्याचे फुलांची उधळण करीत जंगी स्वागत केले.