Breaking News

‘राफेल’आले हो अंगणी…!

बहुप्रतिक्षित विमाने अखेर भारतीय भूमीत दाखल

अंबाला (हरियाणा) : वृत्तसंस्था
शत्रूला शोधून अचूकतेने वार करणारे ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल बुधवारी (दि. 29) भारतात दाखल झाले. फ्रान्सवरून सुमारे सात हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या पाच विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर सुरक्षित लॅण्डिंग केले.
फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर बुधवारी भारतात दाखल झाली.
फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करून या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.
सुपरस्टार ऑफ द स्काय
शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करून स्वत:चा बचाव करण्याच्या तंत्रज्ञानामुळे राफेल इतर विमानांपेक्षा वेगळे ठरते. त्यामुळे राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटले जाते. याआधी टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला यासाठी वेगवेगळी विमाने लागायची, पण एकटे राफेल ही सर्व कामे करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून त्याला मल्टीरोल फायटर जेट असेही म्हटले जाते.
पंतप्रधान मोदींकडून अनोखे स्वागत
राफेल विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनोख्या पद्धतीने या विमानांचे स्वागत केले. 2016 साली मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता. अखेर राफेल विमाने भारतीय भूमीवर उतरली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानांच्या स्वागतासंदर्भात राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च॥ नभः स्पृशं दीप्तम…स्वागतम्!, असा संस्कृत श्लोक ट्विट केला.

पक्ष्यांनी अंबालामध्ये सुरक्षित लॅण्डिंग केले आहे. राफेल विमाने भारतात दाखल होणे ही भारतीय सामर्थ्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या विमानांनी भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढले आहे.
-राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply