Breaking News

दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी

कोकण विभाग राज्यात अव्वल

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल ठरला आहे.
गुणांचा पाऊस
गेल्या वर्षी निकाल सडकून आपटला होता. 2006 सालानंतरचा तो सर्वाधिक कमी निकाल होता. नवा अभ्यासक्रम हे त्यामागचे कारण मानले जात होते. यंदा पुन्हा जुना पॅटर्न राबविल्याने निकालाने उसळी घेतली. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 18.20 टक्के वाढ झाली आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा, कृतीपत्रिका आणि कोरोनामुळे रद्द झालेल्या भूगोल विषयाचे सरासरी गुण या बाबी जास्त निकाल लागण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
मुलींची सरशी
एकूण 17 लाख 9 हजार 264 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख एक हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल 96.91 टक्के, तर मुलांचा निकाल 93.90 टक्के इतका लागला आहे. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा 3.1 टक्क्यांनी जास्त आहे.

सीकेटी विद्यालयाचे धवल यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विद्यालयातून योगिता सचिन पाटील व साहिल सुनील चांदोरकर हे दोघे प्रत्येकी 93.60 टक्के गुण मिळून संयुक्तपणे प्रथम, तन्वी राजेश डुंबरे (92.80%) द्वितीय आणि कार्तिक निलेश जोशी (92.40%) हा विद्यार्थी तृतीय आला आहे. विद्यालयातील 73 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 60 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर 19 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.
संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच कार्यकारिणी मंडळाचे सदस्य, प्राचार्य इंदूताई घरत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply