Breaking News

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण

रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयान ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली असून, तब्बल सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी पाच लाख 67 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 11 लाख 45 हजार 629 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 51 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.44 टक्के इतके झाले आहे. देशातील रिकव्हरी आणि डेथ रेशियो 96.84 टक्के : 3.16 टक्के इतका झाला आहे.
रायगडात 350 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद रविवारी (दि. 1) झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 295 रुग्ण बरे झाले.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 139, ग्रामीण 49) तालुक्यातील 188, पेण 37, खालापूर 28, कर्जत 25, अलिबाग 21, उरण 14, माणगाव व रोहा प्रत्येकी 11, श्रीवर्धन व महाड प्रत्येकी सहा आणि म्हसळा तालुक्यातील तिघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल, खालापूर व पेण तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.
दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15,942 आणि मृतांची संख्या 433 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12,252 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3257 विद्यमान रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply