Breaking News

संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा निषेध; वीज ग्राहकांना न्याय न दिल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांना कोंडून ठेवू -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

महावितरणने येत्या सात दिवसांत वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करून सामान्य ग्राहकांना न्याय न दिल्यास पुढील आठवड्यात त्यांच्या प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकून अधिकार्‍यांना आत कोंडून ठेवण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 4) टाळेबंद आंदोलनप्रसंगी दिला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी गोरगरिबांवर अन्याय करीत आहे. या सरकारला त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील, असा निषेधात्मक संतापही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्याने व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने वीजग्राहक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेल्या जाचक वीज बिलांची पडताळणी करून सुधारित बिले नागरिकांना मिळावीत तसेच वीज दरवाढ रद्द करावी, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेलजवळील भिंगारी येथील कार्यालयासमोर टाळेबंद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार ठाकूर बोलत होते.

कोरोना संक्रमण पाहता केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी 70 हजार कोटी रुपयांचे, तर उद्योगधंद्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे भरघोस पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार डोळे मिटून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे.

रेशन वाटपातही राज्य सरकारने पिवळे आणि केशरी रेशनकार्ड करीत ढिसाळपणा केला. कोरोनाच्या काळात या रोगाला सामोरे जाताना नागरिकांचे मोठे हाल होत आहे. उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरीही हे सरकार निद्रिस्त अवस्थेत आहे. लोकांना दिलासा देण्याऐवजी तीन पक्षांचे सरकार सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करीत आहे, असा घणाघात करीत महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी निषेध व्यक्त केला.    

वाढीव बिलांची दुरुस्ती करून सुधारित देयके देण्याचे आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात तसे न करता गुपचूपपणे वीज दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकाला नाहक त्रास आणि आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रताप महाविकास आघाडी सरकार आणि महावितरणने केला आहे, असे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनाचा धसका घेऊन महावितरणने स्वतःहून टाळे लावल्याचे सांगून वीज ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडते. त्यामुळे या सेवेचा आणि नागरिकांचा विचार करता संवेदनशीलता राखत प्रतिकात्मक टाळेबंद करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे, मात्र प्रश्न निकाली न निघाल्यास अधिकार्‍यांना खुर्चीतून उठून देणार नाही, असा सज्जड दमही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. या वेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुशील शर्मा यांनीही आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक-नगरसेविका, पंचायत समिती सदस्य यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply