Breaking News

पनवेलमधील दुकाने, मॉल सुरू करण्याची व्यापार्‍यांची मागणी

पनवेल : वार्ताहर
केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईसह इतर शहरांतील दुकाने, मॉल्स सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पनवेल शहरातील मॉल्स व दुकाने सुरू करण्यास यावी, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने मार्च महिन्यात सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केला. सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापने, व्यवहार पूर्णपणे बंद होते. त्या वेळी ते आवश्यक होते, पण त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक जण बेरोजगारही झाले. ही विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी पुनश्च हरी ओम म्हणत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
शासनाने सर्व दुकाने आणि मॉल सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. मुंबई-पुणेसारख्या शहरांत या आदेशाची अमंलबजावणी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याचप्रमाणे पनवेलमधील मॉल्स व दुकाने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसे झाल्यास बाजारात होणारी गर्दी कमी होईल आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. यासाठी दुकानदार व व्यापार्‍यांनी मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरातील मॉल्स व दुकाने सुरू करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मागणी केली आहे.
व्यापारी व ग्राहकांसाठी सध्या सणासुदीचा काळ आहे. कोविड प्रसार होऊ नये म्हणून नागरिक स्वतः काळजी घेत आहेत, सुरक्षितता पाळत आहेत. याबाबत दुकानदार आणि मॉलमालकसुद्धा खबरदारी घेतील. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांकडून होत आहे.

पनवेलमधील मॉल्स व दुकानांत शेकडो कामगार काम करीत आहेत. मुंबई, पुणे येथे मॉल्स व दुकाने सुरू झाली आहेत. त्याप्रमाणेच पनवेलमध्येही कार्यवाही झाल्यास कामगारांना रोजगार आणि थांबलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शिवाय ग्राहकांची गैरसोयही टळेल.
-मंगेश परूळेकर, मालक, ओरियन मॉल

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply