पनवेल ः प्रतिनिधी
गोविंदा गेला रे गेला, आता वर्षभर मडकी सांभाळ रे कुंभारा…असे म्हणायची वेळ यंदा कुंभार समाजावर आली. या वर्षी गोपाळकाला दोन दिवसांवर आला तरी हंडीसाठी मडकी घ्यायला कोणी येत नसल्याने कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. पनवेलमधील कुंभारवाड्यातील दैवत व ज्ञानेश्वर हे पनवेलकर बंधू दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनवतात. आज त्यांच्याकडे शेकडो रंगवलेली मडकी तयार आहेत, पण कोरोनामुळे दहीहंडीला बंदी असल्याने त्यांना या वर्षी लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीकृष्ण भारतीयांचा लाडका देव आहे. त्यामुळे गोकुळाष्टमीचा उत्सव सर्वत्र थाटामाटात साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला जातो. भजन, पूजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजिले जातात. दुसर्या दिवशी चौका-चौकात दहीहंडी लावली जाते. कृष्णनामाच्या गजरात हंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक उत्साहाचा दिवस असतो.
मंगळवारी (दि. 11) मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म व बुधवारी दहीहंडी उत्सव आहे, पण कोरोनामुळे शासनाने दहीहंडी फोडताना सोशल डिस्टन्सिंग पाळता येणे शक्य नसल्याने त्यावर बंदी घातली आहे. हंडी बांधण्याला परवानगी नसल्याने यंदा रंगवलेल्या मडक्यांना बाजारात मागणी नसल्याचे दैवत व ज्ञानेश्वर या पनवेलकर बंधूंनी सांगितले. या कुटुंबाचा रंगीत मडकी बनविण्याचा पिढीजात धंदा आहे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दुसर्या दिवसापासून हे बंधू मडकी रंगविण्याचे काम सुरू करतात, पण यंदा ऑर्डर मिळत नसल्याचे ते सांगतात.
दहीहंडीसाठी लागणारी मडकी गुजरातमधून आणली जातात. त्याची ऑर्डर मे महिन्यातच द्यावी लागते. दरवर्षी 1000-1200 मडकी लागतात. रंगकाम साहित्यासाठी लाखोंचे भांडवल कर्ज काढून उभारण्यात येते. रंगविलेली मडकी नंतर उपयोगी नसल्याने ती पुढील वर्षापर्यंत सांभाळून ठेवावी लागतात. दरवर्षी 10-12 मडकी शिल्लक राहतात. कोरोनामुळे यंदा धंदा नसल्याने 25-30 मडकीही विकली न गेल्याने शेकडो मडकी कशी सांभाळून ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट आल्याचे पनवेलकर बंधूंनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper