नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई शहरातील नागरिकांना भेडसाविणार्या समस्या व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी
(दि. 11) भेट घेतली. या वेळी सिरम इन्स्टिट्यूटमार्फत तयार करण्यात येत असलेल्या लसींची नोंदणी नवी मुंबई पालिकेने करून ठेवावी. त्यामुळे नवी मुंबईकरांना डोस उपलब्ध होऊन कोरोनाचा विळखा दूर करण्यास मदत होईल, तसेच शहरातील खासगी रुग्णालयांनी मनमानी शुल्क आकारून आर्थिक लूट सुरू केली आहे. रुग्णालयांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी महानगरपालिकेमार्फत वैद्यकीय लेखा परीक्षण पथक स्थापन करण्याची मागणीही आमदार गणेश नाईक यांनी या वेळी केली.
दररोज 500 रिपोर्ट्स मिळतील या पद्धतीने लॅबची क्षमता वाढवावी. सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील कोविड रुग्णालयाचे स्थलांतर सिडको एक्झिबिशन सेंटर येथे करून प्रथम संदर्भ रुग्णालय हे नागरिकांना सर्व वैद्यकीय उपचाराकरिता सुरू करावे. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्ग झालेल्या नागरिकांना स्टेडियम, महापालिका, सिडको व एमआयडीसीच्या मोकळ्या इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्था करावी. गणपती विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेमार्फत मोबाइल अॅप तयार कारावे. त्या अॅपद्वारे विसर्जनाची वेळ निश्चित करावी, अशी मागणीही आमदार गणेश नाईक यांनी या वेळी केली.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे शिक्षणासाठी मोबाइल, इंटरनेट, संगणक यांसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करावे. अशा विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शाळा पालकांकडे फी वसुलीकरिता तगादा लावत आहेत, अशा शाळांवर महापालिका स्तरावरून कठोर कारवाई करण्यात यावी. नवी मुंबई शहरातील नागरिक तसेच महानगरपालिका क्षेत्रातील निवासी व लघु उद्योजकांचा एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचा मालमत्ता कर व पाणी बिल माफ कारावे, अशा विविध मागण्यांसाठी व सूचनांसाठी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली.