खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत.
अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे अवेळी खंडित होणार्या विजेमुळे कोरोना संकटात ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, शासन नियमानुसार घरी राहून ऑनलाइन कामकाज करणारा नोकदारवर्ग अधिक हैराण होत आहे. नियमितपणे मंगळवारचा शटडाऊन घेऊनही दररोज सरासरी चार ते पाच तास तीही कोणतीही पूर्वसूचना न देता वीज गायब होत असल्याने गृहिणी, व्यापारीवर्गही संतापला आहे.
कार्यालय, शाळा व महाविद्यालयांना ऑनलाइन कामकाज वेळात अचानक वीज खंडित होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक वेळा शैक्षणिक व आर्थिक नुकसानही होतेे.
-मनीष पाटील, अभियांत्रिकी विद्यार्थी
सतत कोसळणार्या पावसाने तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वीज खंडित होते. यंत्रणा याही स्थितीत अडचण दूर करून वीजपुरवठा सुरळीत करीत असतात, मात्र काही बाबी हाताबाहेर असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.
-अमित गोरी, उपकार्यकारी अभियंता