
रोहे : प्रतिनिधी
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजासाठीही शासन दरबारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे आणि मराठा आरक्षण सोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यरत असणारी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे हे आपल्या सर्व सहकार्यांसोबत रोहा येथील पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व समाजबांधवांसोबत संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता रोहा येथे येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजता रोहा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे प्रथम आगमन होईल. येथे सकल मराठा समाज रोहा तालुका ह्यांच्या सोबत तालुक्यातील व परिसरातील अनेक सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्व समाजबांधव, अनेक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी व त्यांचे सर्व सहकारी ह्यांच्याशी सुसंवाद व चर्चात्मक विचारविनिमय करून समाजापोटी अधिकाधिक वास्तववादी योगदान कसे दयावे लागेल, कोणती दिशा ठरवावी लागेल, काय ध्येयधोरणे असावेत ह्यांवरती फक्त एक समाजबांधव म्हणूनच ते सर्वांशी बोलणार आहेत. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसोबत ते तांबडी येथे पिडीत मुलीच्या घरी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper